नवी दिल्ली ः शेतकरी आंदोलनकर्त्यांनी आता विविध राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधातील आंदोलन पोहोचविण्याची रणनिती तयारी केली आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांनी त्याची सुरुवातदेखील केली आहे. शेतकरी नेते महाराष्ट्र, पटना, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी संपर्क साधत आहेत.
केंद्रातील नेते असं सांगत आहेत की, हे कृषीविरोधी आंदोलन केवळ पंजाबपुरते मर्यादित आहे. त्याला काॅंग्रेस आणि विरोधी पक्ष प्रोत्साहित करत आहेत. त्यामुळे शेतकरी हे आंदोलन आता विविध राज्यांमध्येदेखील पसरले जावे, यासाठी रणनिती आखत आहेत. त्यासाठीचे शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी संपर्क साधत आहेत.
ऑल इंडिया किसान संघर्ष को-ऑर्डिनेशन समितीने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या अखेरपर्यंत आंदोलन सर्वदूर पोहोचविण्यावर भर दिला जाईल. यातून कृषी कायद्यांविरोधात देशातील १५ राज्यातील ५०० शहरांपर्यंत हे आंदोलन पोहोचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
यासंदर्भात किर्ती किसान युनियनचे महासचिवर सतबीर सिंह म्हणाले की, “दिल्लीमध्ये कृषी कायद्याविरोधात आंदोलनासाठी बसलेल्या २५ शेतकरी संघटना विविध राज्यामध्ये आंदोलनाचे लोन पसरावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी हळुहळु आणखी राज्यातील शेतकरी संघटनांना सहभागी करून घेतले जात आहे. लवकर पंजाब आणि हरियाणा राज्यांच्या पलिकडे हे आंदोलन पसरलेले पाहायला मिळेल.”