मुंबई : महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या घरामध्ये ई़डीच्या नोटीसा सारख्या येतच आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीची धाड पडली. नंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नुकतीच ईडीची चौकशीसाठी नोटीस आली आहे आणि आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनादेखील ईडीची नोटीस आली आहे, यावरून राजकीय वर्तुळात चांगलंच वादळ पेटलं आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर लगेचच ईडीच्या कार्यालयावर ‘भाजपा’ प्रदेश कार्यालय असे बॅनर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लावले.
या बॅनरचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्वरीत ईडीच्या कार्यालयाजवळ पोहोचले. तुम्हाला हा बॅनर काढता येणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेला तक्रार करा असं शिवसैनिकांनी पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी नंतर हा बॅनर खाली उतरवला आहे.
पत्रकार परिषदेत संजय राऊत काय म्हणाले…
बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं असं म्हणत राऊत यांनी पत्रकार परिषदेमधून भाजपावर घणाघाती टीका केलीय. मला तोंड उघडायला लावू नका भाजपाच्या नेत्यांची संपत्ती १६०० पटीने कशी वाढली याचा हिशोब माझ्याकडे आहे. महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेत. ईडी भाजपाचा पोपट असला तरीही मला ती सरकारी संस्था असल्याने माझ्या मनात ईडीबद्दल आदरच आहे. माझ्याकडे भाजपाच्या १२० नेत्यांची यादी आहे ते सगळे ईडीच्या रडारवर येऊ शकतात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपाचे काही मध्यस्थ आहेत जे मला वारंवार भेटले आहेत मागच्या वर्षभरात त्यांनी मला भेटून हे सरकार पाडण्यासाठी सांगितलं आहे. मी जर ठरवलं तर भाजपाच्या दिग्गज नेत्यांना नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखं परदेशात पळून जावं लागेल.