कोल्हापूर ः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीवर व्यक्त केलेल्या विचारांचा समाचार घेत भाजपाचे प्रदेध्याक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, “ईडीची कारवाई आणि भाजपाचा काहीही संबंध नाही. ईडीचा संबंध भाजपाशी जोडणं असमंजसपणा आहे. संजय राऊत आणि विरोधकांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना मान्य नाही, त्यामुळे असं काही घडलं की ते टीका करायला लागतात”, असे बोलत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
“मध्यंतरी राऊत यांनी शंभर जणांची यादी देतो, त्यांना ईडीची चौकशी लावा असे म्हटले होते. त्यांनी शंभरच काय तर दोनशे जणांची यादी द्यावी, कारवाईसाठी पाठपुरावा करावा. आम्ही कोणताही हस्तक्षेप करणार नाही. काहीही झालं तरी भाजपच्या नावानं ओरडता कशाला, काही नसेल तर घाबरता का? काहीतरी असेल म्हणून घाबरता ना?”, असा चिमटा शिवसेनाला चंद्रकांत पाटील यांनी काढला.
सरकार पाडण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाला असता पाटील म्हणाले की, “महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी आमचे कुठलेही प्रयत्न सुरू नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करीत आहोत. आता सत्तेतल्या नेत्यांनाच आपले सरकार जाईल, असे वाटत आहे. त्यामुळेच आम्ही सरकार पाडणार आहे, असे सतत सांगत आहेत”, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.