पुणे : परदेशात कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे परस्थिती भयानक झाली आहे. अनेक ठिकाणी पुन्हा लॉक डाऊन करण्यात आलेले आहे. अश्यातच इंग्लंडमधून पुण्यात आलेल्या प्रवाशांपैकी आणखी 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर इंग्लंडमधून पुण्यात परत आलेल्यांची संख्या 638 वर पोहोचली आहे. मात्र त्यातील 106 जणांचा पत्ताच सापडत नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
देशातील 5.3 टक्के कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत समोर आली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांचे जरी प्रमाण जास्त असले तरी बरे होण्याचे प्रमाणही याच जिल्ह्यात आहे. मात्र जिल्ह्यातील कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 14 हजार 558 इतकी असल्याने पुण्यावरील संकट अजूनही कायम असल्याचं चित्र आहे.
पुण्यात याआधी कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरला होता. दुसऱ्या लाटेतही आधीसारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. ‘आपणा सर्वांना ज्ञात आहेच की कोरोना व्हायरस हा नवीन रुपात येवून आपल्या समोर नवीन आव्हान घेऊन आला आहे. याचा पुढे प्रसार होऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकत्र येवून याला लढा देणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पहिली पायरी म्हणून लंडन किंवा युरोपियन देशांमधून पुण्यात आलेल्या यात्रेकरूंना शोधून त्यांची आर टी पी सी आर चाचणी करून पुढील कार्यवाही करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. मी 25 नोव्हेंबर नंतर पुणे शहरात लंडन किंवा युरोपियन देश येथून आलेल्या आणि आमच्या आरोग्य विभागाने संपर्क न केलेल्या अशा सर्व लोकांना आवाहन करतो,’ असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.