‘त्या’ कॅलेंडरवर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे ‘जनाब’ असा उल्लेख
भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली टीका
मुंबई ः “महिन्याभरापूर्वी शिवसेनेनं अजान स्पर्धा आयोजित केली होती. आता तर त्यांनी बाळासाहेबांच्या नावापुढील ‘हिंदुहृदयसम्राट’ हे बिरुद देखील काढून ‘जनाब’ असा उल्लेख केला आहे. तारखा, चंद्रोदय, सूर्योदय मुस्लिम कॅलेंडरनुसार दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी फक्त ‘शिवा की जयंती’ असा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस केलं गेलंय. याचा आम्ही तीव्र निषेध करतो”, अशा शब्दात भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या हिंदूत्वावर टीका केली आहे.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सहभागी झाल्यापासून भाजपा शिवसेनेच्या हिंदूत्वावर बोट ठेवते आहे. मध्यंतरी शिवसेनेतर्फे अजान स्पर्धा घेतली होती, तेव्हा भातखळकरांना शिवसेनेवर टीका केली होती. आणि आता शिवसेनेच्या वडाळा शाखेकडून नवीन वर्षाचं ऊर्दू भाषेतील कॅलेंडर काढलं आहे, त्यावरून भातखळकरांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
भाजपा नेते भातखळकर म्हणाले की, “शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही”, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केलेली आहे.