रोहित पवार म्हणाले, “उद्या मलाही ईडी नोटीस पाठवेल…”

0

मुंबई ः “सर्वसामान्यांनासुद्धा आता ईडीसारखी संस्था गेल्या पाच वर्षात फक्त राजकीय हेतूने वापरली जात असल्याचं लक्षात आलं आहे. इतकी मोठी संस्था फक्त राजकीय दृष्टीकोनातून वापरली जात  आहे. त्यात काही निष्पन्न होत नाही. उद्या मलाही ईडी नोटीस पाठवेल. ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे”, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

रोहित पवार नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पहाटे ४ वाजता माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना ईडी कारवाईवर भाष्य केले. रोहित पवार पुढे म्हणाले की, “केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे, मात्र राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, अशी आशा आहे. हे मार्केटच पहाटे चार वाजता उघडतं त्यामुळे येथे आलो. सहा वाजता भाजी मार्केट आणि नंतर इतर मार्केट सुरु होतात. हे मार्केट कसं चालतं, याच्यात काय अडचणी आहेत तसंच शेतकरी, व्यापारी, माथाडी कामागर यांच्याबाबतीत असणारे विषय समजून घेण्यासाठी आपण येथे आलो आहोत”, अशी माहिती रोहित पवारांनी दिली.

आगामी महापालिकांच्या निवडणुकीवर महाविकास आघाडीच्या भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले की, “महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी समीरकरण योग्य पद्धतीने बसू शकते. पण शेवटी तो वाटाघाटीचा भाग असतो. काही प्रमाणात तुम्ही पदवीधर आणि विधान परिषद निवडणुका पाहिल्या तर एका ठराविक विचारधारेच्या विरोधात लोकंही आहेत आणि महाविकास आघाडी सरकारही आहे. एकत्रित ताकद मोठी आहे हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दाखवून दिलं. त्यामुळे येथेही भाजपाच्या विचारधारेला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित लढेल. पण शेवटी हे नेते ठरवतील”, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.