ब्रिटनमधून आलेले प्रवासी क्वारंटाइन टाळण्यासाठी लढवतात ‘शक्कल’

0
मुंबई : ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना आढळल्याने भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने नियमावली केली आहे. राज्य सरकारकडून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी व त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र, हे सात दिवसांचे क्वारंटाइन टाळण्यासाठी इतर राज्यांतील विमानतळावर उतरून महाराष्ट्र, मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.

ब्रिटन, युरोप, मध्य पूर्व व दक्षिण आफ्रिका या देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांची २१ डिसेंबरपासून मुंबई विमानतळावर तपासणी केली जात आहे. यापैकी महाराष्ट्राबाहेरील प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. तर अन्य प्रवासी मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहेत. हॉटेलमध्ये सात दिवस राहणे परवडत नसलेल्या प्रवाशांच्या मागणीनुसार महापालिकेने भायखळा येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये त्यांची विनामूल्य व्यवस्था केली आहे. सात दिवसानंतर ज्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असेल त्यांना घरी पाठवण्यात येत आहे, तर ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल त्यांच्यावर  कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात आहे.

मुंबई, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी गेले अनेक महिने प्रचंड मेहनत घेण्यात आली. २५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात आलेल्या प्रवाशांचाही शोध सुरू आहे. यापैकी मुंबईत पाच रुग्णांमध्ये ब्रिटनचा स्ट्रेन आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांचाही शोध घेण्यात येत आहे. परंतु, इतर राज्यांतील विमानतळावर उतरून देशांतर्गत प्रवास करीत महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचा शोध घेणे शक्य होत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.