समाजाला ‘तसले’ पळपुटे पोलीस नको आहेत : अजित पवार
'स्मार्ट वॉच'मुळे पिंपरी चिंचवड पोलीस खऱ्या अर्थाने 'स्मार्ट' होणार
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट वॉच, स्पोर्ट् सायकल वाटप आणि ग्राम सेवा योजनेचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर उषा ढोरे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, आमदार सुनील शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. समाजासाठी 24 तास कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य फिट रहावे यासाठी पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्ट् सायकल वाटप करण्यात आले. तसेच पोलिसांसोबत काम करण्यासाठी ग्राम सुरक्षा योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
अजित पवार म्हणाले; पुणे पोलीस आयुक्तालयात चोरट्यांना पाहून पोलीस पळून गेल्याची घटना घडली. यामुळे पोलिसांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलते. त्यामुळे आपले पोलीस पळपुटे नसावेत, तर चोरट्यांशी दोन हात करणारे असावेत. पुण्यातील त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असून असे प्रकार पोलिसांकडून यापुढे होऊ नयेत असे स्पष्ट आदेश दिले.
एकेकाळी पिंपरी चिंचवड शहरात गुंडगिरी मोठी होती. पोलिसांना काम करताना राजकीय हस्तक्षेप होत असतो. शहरात वाहनांची तोडफोडीच्या घटना होत आहेत. यावर पोलिसांनी आळा घालावा. शहरातील अवैध धंद्यावर कारवाई करुन ते उध्वस्त करावे. शहरातील महिला, तरुणींना फिरताना आपलेल्या सुरक्षित वाटावे असे पोलिसिंग व्हाबे अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.
पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावे यासाठी गृहमंत्री आर.आर. पाटील होते त्यावेळी पासूनच आमचे प्रयत्न सुरु होते. मात्र पाठीमागील सरकारने आयुक्तालय मंजूर केले. मात्र हा निर्णय घाई गडबडीत झाला आहे. आयुक्तालयात अनेक समस्या आहेत, त्यासाठी आम्ही महाआघाडी सरकार सर्वपरीने तयार आहे.
राज्यातील सर्वात स्मार्ट पोलीस आयुक्तालय इमारत, मुख्यालयासाठी जागा, इमारत, पुरेशी वाहने, रिक्त पोलीस अधिकारी पदे, कर्मचारी भरती करण्यात येणार आहे. पोलिसांना राहण्यासाठी सुसज्ज इमारत उभा केली जाणार आहे. वाहनांना इंधन मिळावे यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात येणार आहे. पोलीस खात्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही पवार यांनी सांगितले.
कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच कोरोनामुळे जीव गमावलेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.