खून प्रकरणातील मुख्य आरोपींशी संबंध ठेवणाऱ्या पोलिस हवालदाराचे निलंबन

0

पुणे : जमिनीच्या आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिकाचा खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार व इतर संशयित आरोपीशी संबंध असणाऱ्या पोलिस हवालदाराचे निलंबन करण्यात आले आहे.

चंदनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे परमेश्वर तुकाराम सोनके असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास पोलीस आयुक्तालयाच्या शेजारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एसबीआयच्या प्रवेशद्वाराजवळ घडली.

बावधन ब्रुद्रक येथील सर्व्हे. नं. 348 येथील जमिनीचा निकाल कानाबार यांच्या बाजूने लागणार असल्याचा अंदाज असल्याने आरोपींनी हा गुन्हा केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. याबाबत, विश्वास दयानंद गंगावणे (32, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.

खुनासाठी राजेश शामलाल साळुंके (38, रा. सुखसागरनगर, कात्रज) याने मारेकऱ्याला पिस्तुल आणि काडतुसे पुरविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तो व त्याचा साथीदार राकेश रमेश बुरटे (36, रा. जनता वसाहत, पर्वती. मूळ रा. रत्नागिरी) खुनाचे मुख्य सुत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यांच्यासह सनी अशोक वाघमारे (26, रा. वाघोली), रोहीत विजय यादव (19, रा. सुखसागर नगर, कात्रज), गणेश ज्ञानेश्वर कुर्हे (36), राहुल आनंदा कांबळे (36), रुपेश आनंदा कांबळे (38), हसमुख जसवंतभाई पटेल (31) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी राजेश साळुंके, राकेश रमेश बुरटे रोहीत विजय यादव यांच्यासोबतर पोलिस हवालदार परमेश्वर सोनके हा चंदनगर येथील एका हॉटेलमध्ये बैठकीस बसल्याचे सीसीटिव्हीच्या विश्लेषणावरून निष्पन्न झाले आहे. आरोपी आणि सोनके हे त्या ठिकाणी बसल्याबाबत साक्षीदारांकडून दुजोराही देण्यात आला. सर्वजण घटनेनंतर 5 ऑक्टोबरच्या रात्री 9.30 वाजता गप्पा मारत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सोनके याच्या संपर्कात आरोपी आले असतानाही, त्याने आरोपींना पोलिसांसमोर हजर न करता पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. सोनके याने आरोपींना मदत करण्याच्या हेतूने कृत्य केल्याने, पोलिस दलाची शिस्त मलीन केल्याने, पोलिस शिस्तीस बाधा आणणारे असल्याने आरोपींना मदत करणारे असल्याने निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाने गैरवर्तन केल्याप्रकरणी परिमंडळ 4 च्या उपायुक्तांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.