पुणे : सदाशिव पेठेत एका बंद खोलीत महिलेचा मृतदेह आढळला आहे. सहा दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी हा खून असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदाशिव पेठेत ब्राह्मण मंगल कार्यालयाची एक गल्ली आहे. या गल्लीमध्ये हॉटेल मराठा कोल्हापूर दरबार हॉटेल असून या हॉटेलच्या वरती एका बंद खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सकृतदर्शनी हा खून असावा असा पोलिसांचा संशय आहे.
विश्रामबाग पोलिस तसेच डॉक्टरांचे पथक हे घटनास्थळी पोहोचले आहे. फ्लॅटमध्ये एक कामगार दाम्पत्य राहत होते. गेल्या सहा दिवसांपासून हा फ्लॅट बंद आहे. मृतदेह कुजल्यामुळे त्याचा वास येऊ लागला. त्यानंतर पोलिसांना स्थानिकांनी माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला असता, बाथरूम मध्ये हा मृतदेह पोलिसांना सापडला. या मृतदेहावर फ्लेक्स टाकण्यात आला होता. त्यामुळे हा खून असावा, असा पोलिसांना संशय आहे.