मुंबई : परिणामकारकता सिद्ध झालेली ‘कोव्हिशील्ड’ लस टोचण्यास आज, शनिवारपासून सुरुवात होणार आहे.
भारताच्या औषध महानियंत्रकांनी दोन लशींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ‘ऑक्सफर्ड’ने विकसित केलेली आणि ‘सीरम’ संस्थेने उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशील्ड’ लशीने तिन्ही मानवी चाचण्या पूर्ण केल्या आहेत, परंतु भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.
‘कोव्हिशील्ड’ची परिणामकारकता ७० टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे, परंतु ‘कोव्हॅक्सिन’च्या परिणामकारकतेचे निष्कर्ष अद्याप प्रतीक्षेत आहेत. शिवाय, सरकारने एकीकडे लस घेणे ऐच्छिक आहे, असे स्पष्ट केले आहे, पंरतु लस निवडण्याचे स्वातंत्र्य मात्र दिलेले नाही. देशभर पहिल्या दिवशी देशभर सुमारे तीन लाख करोना योद्धय़ांच्या लसीकरणाचे लक्ष्य आहे. लसीकरणासाठी १०७५ हा मदतसेवा क्रमांक २४ तास कार्यरत असेल.
दरम्यान, राज्यात शनिवारी २८५ केंद्रांवर करोना लसीकरण मोहीम सुरू होणार असून पहिल्या दिवशी २८ हजार ५०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेचा प्रारंभ जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईत कूपर रुग्णालयात शनिवारी सकाळी साडे दहा वाजता होईल. त्यानंतर राज्यातील २५८ केंद्रांवर लसीकरणास सुरुवात होईल. राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी सकाळी ११.३० वाजता मुंबईतील वांद्रे-कुर्ला करोना आरोग्य केंद्रात करणार आहेत. दररोज सकाळी नऊ ते पाच या वेळेत लसीकरण के ले जाईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.