अहमदनगर : कृषी कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात झालेली नववी बैठकही निष्फळ ठरली आहे. पुढची बैठक ही १९ जानेवारीला होणार आहे. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
अण्णा हजारे म्हणाले की, आपण सकारविरोधात उपोषण करतो म्हणून केंद्र सरकार आपल्याशी सूडबुद्धीनं वागते की काय, असा संशय निर्माण होत आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारनंही अशाच सुडाच्या भावनेनं उपोषण करून नये म्हणून आपल्याला तुरुंगात टाकलं होतं. मात्र, हे त्यांना चांगलंच महागात पडलं. जनतेनंच त्या सरकारला धडा शिकविला. त्यामुळं आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात सध्याच्या सरकारनंही राहू नये, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.
उपोषणासाठी जागा दिली नाही तर मागीलप्रमाणे जागा मिळेल तिथं उपोषण करीन, असं अण्णा हजारे यांनी सांगितले. तसेच उपोषणाची माहिती देण्यासाठी सरकारला आणि जागेची परवानगी मिळावी यासाठी संबंधित प्रशासनाला पत्रं पाठविली आहेत. त्यांचे उत्तर न मिळाल्यानं अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद मोदी यांना पत्र लिहून आपण माझ्याशी सूड बुद्धीनं वागत आहात का, असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे.