याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, लष्कर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्याच्या आशिर्वादामुळे हद्दीत राजरोसपणे अवैध धंद्ये चालू असल्याची चर्चा सध्या पोलिस वर्तुळामध्ये आहे.
पोलिस आयुक्तांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले असताना देखील धंदे सुरु ठेवले जात आहेत. शहरात अवैध धंदे बंद करा असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. त्यावर गुन्हे शाखा नजर ठेवून आहे. धंद्याच्या माहिती मिळताच कारवाई देखील होत आहे.
गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना लष्कर पोलीस ठाण्याच्या परिसरात एका इमारतीत जुगार सुरू असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर त्यांनी या माहितीची खातरजमा केली. त्यावेळी चार मजली इमारतीत फुल तेजीत जुगार सुरू असल्याचे दिसून आले. यानुसार मोराळे व उपायुक्त बच्चन सिंह यांनी गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि दोन च्या पथकांना या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने आज काही वेळापूर्वी छापा टाकला. त्यावेळी येथून 63 जणांना पकडले असून, पावणे दोन लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
कारवाई सुरू असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली आहे.