पुणे : ‘शादी डॉट कॉम’ या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर तरुणीला लग्नासाठी मागणी घालून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्न करण्यास नकार देणाऱ्या एका तरुणावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सागर देवराज प्रधान (३१, रा. एच ई फॅक्टरी, रेंजहिल्स, पुणे) असे दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका २९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी तरुण हा केंद्र सरकारच्या एचई कंपनी असिस्टंट लेबर कमिशनर या पदावर काम करतो. जुलै २०२० मध्ये त्याची फिर्यादी तरुणीसोबत ‘शादी डॉट कॉम’ या वेबसाईटवर ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाची मागणी घातली आणि तिच्याशी ओळख वाढवली.
तिचा विश्वास संपादन करून रेंज हिल परिसरातील सरकारी टाईप्स क्वार्टर्समध्ये तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर फिर्यादी तरुणीने आरोपीकडे लग्न करण्याची मागणी केली असता तो टाळाटाळ करू लागला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात संबंधित तरुणीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
खडकी पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपीची सध्या बदली झाली असून तो गुजरात राज्यात कार्यरत आहे. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.