मुंबई : राज्याची कोरोनाची परिस्थिती पाहून 1 मार्चपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तूर्तास अंगणवाडी व बालवाडी यंदा सुरू करण्याचे नियोजन नसून आगामी शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्याच्या दृष्टीने ठोस नियोजन सुरू आहे.
बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे या कालावधीत तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीत होणार आहे. यंदा शाळा उशिरा सुरू झाल्याने बोर्ड परीक्षेसाठी 25 टक्के अभ्यासक्रम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शैक्षणिक वर्ष सुरू करताना शाळा सुरू न झाल्याने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा दोन महिने (1 मार्च ते 30 एप्रिल) भरविण्याचे नियोजन केले जात आहे. त्याबाबत 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
कठीण काळातही शिक्षक, मुख्याध्यापक, सर्वजण उत्तम काम करत असून आजवर एकही मुलगा कोरोनाच्या विळख्यात सापडला नसल्याचे त्यांनी कौतुकही केले.
कोरोनाचा संसर्ग कमी झाला आणि प्रतिबंधात्मक लस आली म्हणून नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत. पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलांची उपस्थिती पाहून पहिली ते चौथीच्या शाळांचा निर्णय घेतला जाणार आहे.