पंढरपूरचा माघीवारीचा सोहळा रद्द

0

पंढरपूर : शासनाने 28 फेब्रुवारी पर्यत लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्याने, 23 फेब्रुवारी रोजी पंढरपूर मध्ये भरणाऱ्या माघीवारीचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

दशमी आणि एकादशीला श्री विठ्ठल मंदिरच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला असल्याने भाविकांनी वारीच्या सोहळ्यासाठी येऊ नये असे आवाहन समितीचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे.

दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरीता दररोज हजारो भाविक पंढरीत येतात. तर येत्या 23 फेब्रुवारी रोजी माघी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. मात्र, 28 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र शासनाने लॉकडाउन जाहीर केलेले आहे.

याची दखल घेऊन गर्दी होऊ नये. म्हणून माघी यात्रेत दशमी आणि एकादशी दिवशी (ता. 22 व 23 फेब्रुवारी) असे दोन दिवस श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात भाविकांना सोडण्यात येणार नाही. तर दि. 24 पासून म्हणजेच द्वादशी पासून भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात पूर्ववत प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.