मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीतून बाहेर आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धनंजय मुंडे यांच्या दुसर्या पत्नी करूणा यांनी बुधवारी मुंबई पोलिसांकडे त्यांच्याविरूध्द तक्रार केली आहे. त्यामध्ये गेल्या 3 महिन्यांपासुन मुंडेंनी त्यांच्या 2 मुलांना त्यांच्या सरकारी चित्रकूट या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यामध्ये 14 वर्षाच्या मुलाचा देखील समावेश असून ती सुरक्षित नसल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी मदत न केल्यास आपण 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करू असा गंभीर इशारा देखील त्यांनी दिला आहे.
करूणा यांनी थेट पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणार्या तरूणीविरूध्द भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे नेते मनीष धुरी यांनी हनी ट्रॅपचा आरोप केला होता. दरम्यान, धनंजय मुंडे यांचे मेहुणे पुरूषोत्तम केंद्र यांनी देखील आरोप करणार्या तरूणीविरूध्द पोलिसांकडे तक्रार दिली होती. दरम्यान, ते प्रकरण शांत झाले असताना आता करूण यांनी मुंडेंविरूध्द तक्रार केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.