व्यावसायिक उनवणे खून प्रकरणात चार जणांवर गुन्हा दाखल

0

पिंपरी : पिंपरी येथून अपहरण करुन व्यवसायिकाचा खून केल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान घडला आहे.

चिटफंड व्यावसायिक आनंद साहेबराव उनवणे (42, रा. पिंपरी) असे अपहरण आणि खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर अर्जुन चव्हाण यांनी पिंपरी फिर्याद दिली आहे. मयत आनंद उनवणे यांचा चिटफंडचा व्यवसाय आहे. ते 3 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा दहा वाजता राहत्या घरातून बेपत्ता झाले. दरम्यान त्यांच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.

पिंपरी पोलिसांचा तपास सुरू असतानाच रायगड मधील महाड येथे शनिवारी (दि. 6) त्यांचा मृतदेह आढळला. आनंद उनवणे 3 फेब्रुवारी रोजी त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये असताना एका कारमधून तीन ते चारजण आले. आरोपी आणि आनंद यांच्यात झटापट झाली. त्यानंतर आरोपींनी आनंद यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्यांचे पैशांच्या हव्यासापोटी अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचेही पथक समांतर तपास करीत आहे. या प्रकरणातील काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. मात्र, उनवणे यांचे अपहरण आणि खून कोणत्या कारणासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर हे कारण स्पष्ट होईल. तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.