पीएमसी घोटाळ्याप्रकरणी व्यवस्थापकीय संचालक मेहुल ठाकूर व संचालक मदन चतुर्वेदी यांना २३ जानेवारीला अटक केली होती. तसेच ठाकूर बंधूंच्या घरावर व विवा समूहाच्या कार्यालयावर छापे टाकले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाकूर यांची अंधेरीतील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीतील सूत्रांनुसार, मॅक स्टार ही हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची (एचडीआयएल) उपकंपनी आहे. मॅक स्टार या कंपनीने अंधेरी पूर्वेतील कॅलेडोनिया इमारतीतील मालमत्ता बांधली आहे. पीएमसी बँक गैरव्यवहारातील एचडीआयएल ही सर्वांत मोठी कर्जबुडवी कंपनी आहे. एचडीआयएल, मॅक स्टार व विवा समूह यांच्यात संगनमत असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.
जप्त करण्यात आलेल्या दाेन कार्यालयांचा समावेश असून, कागदोपत्री या दोन मालमत्तांची किंमत ३४ लाख ३६ हजार इतकीच दाखविण्यात आली आहे. त्यापोटी विवा समूहाने मॅक स्टारला ३७ चेक दिल्याचे तपासात आढळले आहे. राकेश वाधवान यांनी एचडीआयएल कंपनीमार्फत विवा समूहाचे संचालक मेहुल ठाकूर यांना मोठ्या प्रमाणात निधी वळविला. एचडीआयएलने येस बँकेचे कर्जही बुडविले आहे.