मोगा (पंजाब) – पंजाबमधील मोगा येथे अकाली दल आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तुफान राडा झाला आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत अकाली दलाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर एक अन्य कार्यकर्ता गंभीररीत्या जखमी झाला आहे.
गंभीर जखमी झालेल्या कार्यकर्त्याला प्राथमिक उपचारांनंतर लुधियाना येथे अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. आता अकाली दलाच्या या जखमी कार्यकर्त्यावर लुधियानामधील डीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वॉर्ड क्रमांक ९ मध्ये अकाली दलाचे कार्यकर्ते प्रचार करत होते. तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर वाहन चढवल्याचा आरोप होत आहे. या घटनेत अकाली दलाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर अन्य एक कार्यकर्ता जखमी झाला.
जखमी कार्यकर्त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारांसाठी त्याला लुधियानाच्या डीएमसी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेदरम्यान, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली आहे.