पिंपरी : घरी निघालेल्या महिलेला अडवून, जबरदस्तीने दुचाकीवर बसवून, मारहाण करुन, लॉज मध्ये नेऊन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार चिंचवड, आकुर्डी, रावेत परिसरात घडला आहे.
या प्रकरणी 32 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. तर फिरोज बबलू शेख (20, रा. बंडगार्डन रोड, कॅम्प पुणे), संकेत दारवडकर (20, रा. बंडगार्डन रोड, कॅम्प पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास चिंचवड मधील लोकमान्य हॉस्पिटलजवळ महिलेला अडवले. तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. तिच्या दुचाकीची तोडफोड करून तिचे नुकसान केले. दुचाकीवर जबरदस्तीने बसवून नेले.
पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या लकी हॉटेलमध्ये एका रूमवर नेले. तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. महिलेने विरोध केला असता फिरोज याने ‘मी आता तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत महिलेचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास चिंचवड पोलीस करत आहेत.