मुंबई : पॉर्न व्हिडिओ तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या रॅकेट मध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने आठव्या आरोपीला अटक केली आहे. तर अशाच आणखी एका प्रकरणात मालवणी पोलिस ठाण्यात नव्याने एक गुन्हा दाखल झाला आहे.
मालिका, वेब सिरीज तसेच चित्रपटांमध्ये भूमिका मिळवून देण्याचे अमिष दाखवून तरुणींचे अश्लील व्हिडिओ बनविणाऱ्या पॉर्न प्रोडक्शन कंपनीचा गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने गेल्या आठवड्यात पर्दाफाश केला.
पोलिसांनी बंगल्यातून यासिन बेग खान उर्फ रोवा, प्रतिभा नलावडे, मोनू जोशी, भानुसुराम ठाकूर आणि मोहमद आसिफ या पाच जणांना अटक केली. यासिन बेग ही निर्माता दिग्दर्शक असून त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री गहना वसिष्ठ हिचे नाव पुढे आले होते.
या व्हिडीओ चित्रफीत परदेशात विकणाऱ्या उमेश कामत यालाही अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे आर्थिक व्यवहार तसेच इतर पुराव्यांवरून आणखी आरोपींची नवे समोर येत असून मंगळवारी रोवा हिचा पती शान याला अटक करण्यात आली.
पॉर्न प्रोडक्शन कंपनीला अर्थपुरवठा बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीच्या कंपनीतून होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिच्या पतीचीही या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे.