‘आयटी हब’ हिंजवडीच्या सरपंचपदी गणेश जांभूळकर; उपसरपंचपदी मनीषा हुलावळे

0

पिंपरी : राज्यात आयटी हब म्हणून ओळख असणाऱ्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी म्हातोबा ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे गणेश बन्सीलाल जांभूळकर यांची तर उपसरपंचपदी मनीषा जयसिंग हुलावळे यांची 15 विरुद्ध 2 अशी बहुमताने निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार डोंगरे यांनी दुपारी अडीच वाजता या दोघाच्या नावांची घोषणा केली. यावेळी सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर यांनी काम पाहिले.

हिंजवडीतील सरपंचपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने या पॅनलमध्ये निवडून आलेल्या 15 जणांमध्ये पहिले पद कुणाला यावरून मोठी चुरस होती. सरपंच-उपसरपंच पदासाठी प्रत्येकी तीन-तीन अर्ज आले होते, त्यापैकी शिवनाथ जांभुळकर यांनी माघार घेतल्याने गणेश जांभुळकर आणि मयूर साखरे यांच्यात गुप्त मतदान घेण्यात आले.

उपसरपंच पदासाठी मनीषा जयसिंग हुलावळे, रेखा संदीप साखरे व आरती वैभव बेंद्रे यांनी उमेदवारी अर्ज भरले त्यापैकी रेखा साखरे यांनी माघार घेतल्यावर मनीषा हुलावळे व आरती बेंद्रे यांच्यात गुप्त मतदान घेऊन हुलावळे यांना 15, तर बेंद्रे यांना केवळ 2 मते मिळाली.

ग्रामविकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेत सर्वानी भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष केला.

Leave A Reply

Your email address will not be published.