भाजपा नेत्या चित्रा वाघ यांना धमकी, राजकीय प्रतिक्रिया, नातेवाईकांचे मत, तपासात पुढे येत असलेल्या धक्कादायक माहिती
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; वाचा सविस्तर....
मुंबई : सध्या राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत आहे. यामध्ये भाजपचे राजकीय मंडळी या प्रकरणाची कसून चौकशी होऊन, यातील कथित मंत्र्यावर कारवाईसाठी आग्रही आहेत. यातच रोखठोक भूमिका मांडणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत चित्रा वाघ यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.
चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी सुरुवातीला दबक्या आवाजात मंत्री राठोड यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, वाघ यांनी थेट सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांसमोर येऊन संजय राठोड यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर या प्रकरणावरुन त्यांना आता धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.
“धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही. त्यामुळे उगाच मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो”, असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी ट्विटरवर दिलं आहे. “राजसत्तेकडे प्रचंड ताकद असते. सर्वसामान्य माणसाचा पाशवी राजसत्तेपुढे टिकाव लागू शकत नाही. मीडिया आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून ज्यांनी राजसत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलीस बळाचा वापर करून चिरडण्याचे प्रकार दिवसाआड होतायत”, असं चित्रा वाघ ट्विटरवर म्हणाल्या.
“राजसत्ता पाठीशी असल्यानेच तर कर असली तरी डर कशाला? ही मानसिकता बळावली आहे. राजदंडाचे अभय मिळाले आणि सामाजिक न्याय अबाधित राहिलं. पूजा चव्हाणला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, तिच्यावर अत्याचार केले, त्यालाही कदाचित असंच अभय मिळेल?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरवर केला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आज वेगळा खुलासा झाला. पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा जबाब पूजासोबत असलेल्या दोघांनी दिल्याची माहिती मिळत आहे. इतकच नाही तर रुममध्ये वाईनच्या वाटल्याही सापडल्याची माहिती मिळत आहे. वानवडी पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचा जबाब नोंदवला आहे. या जबाबानुसार आता पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूजा चव्हाणच्या आई-वडिलांचा जबाबत पोलिसांनी यापूर्वीच नोंदवला आहे. या घटनेचा उलगडा होण्यापर्यंत तपास सुरु राहणार आहे. पोलीस महासंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मिळतेय. पण पोलीस मात्र याबाबत अधिकृतपणे बोलत नाहीत. दरम्यान आज उशिरापर्यंत पोलीस महासंचालकांना चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
पूजाच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तिच्या आजोबांनी केली आहे. सरकारनं CID सारख्या यंत्रणेमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी पूजाच्या वसंतनगरमध्ये राहणाऱ्या आजोबांनी केली आहे. पूजाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचे कुटुंब मानसिक धक्क्यात असून कुटुंब काही बोलायला तयार नाही. परळी शहरात पूजाचं घर आहे, या घरात तिचे आई-वडील राहतात पूजाच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. माझ्या मुलीच्या आत्महत्येची चौकशी करा एवढीच मागणी पूजाच्या वडिलांनी केली.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांची कारवाई दबावात होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. पोलीस जोपर्यंत कारवाई करत नाहीत तोपर्यंत त्यांना खुलं मैदान आहे. पोलिसांवरील दबाव नाहीसा झाला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्य ऐकून त्यांनी या प्रकरणाची माहिती नीट घेतली नसल्याचं वाटतं. उद्धव ठाकरेंना गांभीर्य लक्षात आलेलं नाही, त्यांनी याप्रकरणाला गांभीर्यानं घेतलेले दिसत नाही. त्यांनी या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी, क्लीप्स नीट ऐकाव्या यावरून कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते कळेल, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज नागपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांचं पूजा चव्हाण प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांकडे लक्ष वेधण्यात आलं. त्यावर थोरात यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून लावले. पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पोलीस दबावात काम करतात अशी पद्धतच नाही. कोणताही पोलीस दबावाखाली काम करत नाही, असं थोरात म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी होईल. यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चौकशीतून सत्य समोर येईल. मुख्यमंत्री कुणालाही पाठिशी घालणार नाहीत, असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडलं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणी चर्चेत आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल. राजकारणात एखाद्याचा बळी घ्यायचा, त्याची बदनामी करायची, चारित्र्यहनन करायचे, असे प्रकार वाढले आहेत, संजय राठोड हे अनेक वर्ष राजकारणात आहेत. राठोड हे विदर्भातील शिवसेनेचा आधारस्तंभ आहेत, त्यांच्या समाजातील सर्वोच्च नेते आहेत, असं राऊत म्हणाले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात जो जबाबदार असणार त्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतरच कारवाई करता येईल. त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलं.
पूजाने आत्महत्या केल्यानंतर तिचा फोन आणि लॅपटॉप घेण्यासाठी मंत्र्याकडून प्रयत्न केला जात असल्याचं ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होतं. या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये काय दडलंय हे स्पष्ट झालं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांना या प्रकरणाचा खोलात जाऊन चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी माजी मंत्री मदन येरावार यांनी केली आहे. एखाद्या मंत्र्यावर आरोप होत असतील तर त्या मंत्र्यांनी समोर येऊन उत्तर द्यायला हवं. आठ दिवस होऊनही ऑडिओ क्लिप असतानाही चौकशी होत नाही, याला काय म्हणायचं? मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या ऑडिओ क्लिप ऐकल्या पाहिजे. यातील संभाषण राठोड यांच्या आवाजातील असल्याचं स्पष्ट होत असल्याने संशय निर्माण होत आहे, असं सांगतानाच या प्रकरणी जनतेत मोठा रोष आहे. या संदर्भात आम्ही आंदोलन करू शकतो, असा इशाराही येरावार यांनी केला आहे.