ज्ञान प्रबोधिनी निगडीचे संस्थापक वा. ना. अभ्यंकर यांचे निधन

0
पिंपरी : ज्ञान प्रबोधिनी निगडीचे संस्थापक, माजी केंद्रप्रमुख व संस्कृतचे गाढे अभ्यासक श्री. वामन नारायण तथा भाऊ अभ्यंकर (वय ७९ ) यांचे दीर्घ आजाराने आज त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेले तीन महिने ते पक्षाघाताने आजारी होते. आज सकाळी ९.३५ वाजता हृदयक्रिया बंद पडून त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले आहे.

त्यांच्या निधनाने ज्ञान प्रबोधनी परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व २ मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मातृ मंदिरात नागरिकांची रीघ लागली होती. दुपारी ४ वाजता निगडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभ्यंकर यांचा जन्म कोकणात नारिंग्रे या गावी झाला. वयाच्या एकविसाव्या वर्षी ते पुण्यातील नूमवि प्रशालेत शिक्षक म्हणून रुजू झाले. ज्ञान प्रबोधिनी, पुणेचे संस्थापक वि. वि. तथा आप्पा पेंडसे यांच्यामुळे ते ज्ञान प्रबोधिनी पुणे येथे कार्यरत झाले. तेथे १४ वर्षे त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले होते. काही काळ त्यांनी ज्ञानप्रबोधिनी पुणेची कार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळली.

निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. ज्ञानप्रबोधिनी निगडीच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. अखेरपर्यंत ते ज्ञानप्रबोधिनीच्या कामात सक्रिय होते. त्यांनी मातृमंदिर विश्वस्त संस्थेची स्थापना केली. ज्ञान प्रबोधिनी निगडी शाळेचे ते सुमारे पस्तीस वर्षे केंद्र प्रमुख होते. शिक्षण व समाज सेवेमध्ये त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डिलीट पदवी देऊन सन्मान केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.