पुण्यातील दोन हत्या प्रकरणातून मुक्तता झाल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणेची तळोजा येथील कारागृहातून सुटका झाली होती. यावेळी मारणेने 300 गाड्यांच्या ताफ्यासह मिरवणूक काढली. या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढणे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा असल्याचं देसाई म्हणाले.
कुख्यात गुंड गजा मारणे सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून बाहेर आला. त्यावेळी कारागृहाबाहेर मोठ्या संख्येने त्याचे समर्थक जमले होते. गजा मारणे याच्या सुटकेनंतर त्याच्या पिलावळीने एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केले.
पिंपरी – चिंचवडच्या हद्दीतून सायंकाळी पुण्याच्या दिशेने मारणे आणि त्याच्या समर्थकांचा ताफा गेला. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील अनेकांनी काल आपल्या मोबाईलवर मारणे सोबतची स्टेट्स ठेवली होती, फेसबुकवर अपलोड केली होती. या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दोन्ही पोलीस समर्थन करायला आलेल्यांचे सीसीटीव्ही फुटेज, वाहनांचा नंबर यावरुन शोध घेऊन कारवाई करणार आहेत.