पुणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, तसंच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. परंतु संचारबंदी नाही असं जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी कडकपणे करण्याच्या सूचना दोन्ही महापालिका आणि ग्रामीण भागाला देण्यात आल्या आहेत. मात्र या मार्गदर्शनक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही तर निर्बंध लागू केले जाणार आहेत.
पुढं त्यांनी सांगितलं की, सध्या जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. त्यामुळं नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी करता येणार नाही. मात्र जिल्ह्यात संचारबंदी लागू नाही.
मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाईची मोहिम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्ण आढळणाऱ्या परिसराचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. तसंच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचाही शोध घेण्यात येणार आहे.