सातारा : गेल्या काही दिवसांपासून आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी जवळी येथे झालेल्या कार्यक्रमात शशिकांत शिंदेंना उद्देशून “शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत हे बाहेरच्यांना माहीत नाही. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी आपल्या तिघांनाही कळत असतं”, असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील हे उपस्थित राहणार होते. पण शिवेंद्रराजे सोडले तर इतरांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
काही दिवसांपूर्वी शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळीतीलच एका कार्यक्रमात शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. पण त्यावर शशिकांत शिंदे यांनी मी सर्व पक्ष वाढीसाठी करत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज अचानक शिवेंद्रराजे यांनी आपण दोघे एकच आहोत, असे विधान करून पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडवून दिला आहे. यामागे शिवेंद्रसिंहराजे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी (17 फेब्रुवारी) झालेली भेट असण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्यातील वादाची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमात, ‘मी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे. समोरच्याची वाट लागल्याशिवाय गप्प बसत नाही’, असे वक्तव्य केले होते.
त्यांच्या या वक्तव्याचा रोख शशिकांत शिंदे यांच्या दिशेने असल्याची चर्चा होती. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनीही शिवेंद्रराजे यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर शिवेंद्रसिंह राजे यांनी शशिकांत शिंदे आणि शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत हे बाहेरच्यांना माहीत नाही, असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.