उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले

एका गुंडाची मिरवणूक निघणे शहराच्या आरोग्यासाठी चांगलं नाही

0

पुणे :  काही पोलीस अधिकारी आलिशान, महागड्या 35 लाखाच्या वापरतात. मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा कुठल्या तरी उद्योगपतीनं त्या गाड्या पोलिसांना दिल्या होत्या. मात्र, आपण सरकारी अधिकारी आहोत याचं भान राखलं पाहिजे. लोकांचं आपल्यावर बारीक लक्ष असतं, खासगी आयुष्य कसं जगता ही प्रत्येकाची खासगी बाब असली तरी आपण सरकारी अधिकारी आहोत, याचं भान ठेवलं पाहिजे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं आहे.

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गुंड गजा मारणेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसंच मारणेच्या स्वागतासाठी 300 हून अधिक गाड्यांनी एक्सप्रेस वेवर धिंगाणा घातला. त्यावरुन अजित पवार यांनी पोलिसांची कानउघाडणी केली आहे. पुण्यात एका गुंडाची मिरवणूक निघते, हे शहराच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. पोलिसांनी याची खबरदारी घेतली पाहिजे. गुन्हेगारीचं उदात्तीकरण होता कामा नये, याची पोलिसांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही अजित पवारांनी पोलिसांना केलीय.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे गुन्ह्यात जप्त केलेल्या किमती आणि मौल्यवान मुद्देमाल फिर्यादीस पुन:प्रदान कार्यक्रम आज शिवाजीनगर मुख्यालयात पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी अजित पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मोलाचे सल्लेही दिले. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांनाही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

नागरिक फिरायला गेल्यावर तिथले फोटो सोशल मीडियावर टाकतात. मग चोरांना घर मोकळंच मिळतं. घरी येऊन फोटो कुठे टाकायचे तिकडे टाका. अंगभर दागिना घालताना काळजी घेण्याची गरज आहे. कारण काहीजण बारकाईनं लक्ष ठेवून डल्ला मारतात, अशी सूचनाही अजित पवार यांनी नागरिकांना केली आहे.

आपल्या हद्दीत गुन्हाच घडणार नाही यासाठी पोलिसांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पोलिसच चोरांना घाबरुन पळून गेले, हे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं होतं. त्यामुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा खराब होते, मनोबल खचतं.

पोलीस दलाकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. सामान्य माणसाला पोलीस स्टेशनला जावंच लागणार नाही याची काळजी घ्यावी. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन गुन्हेगारी वाढली आहे. यासंदर्भात पोलिसांना योग्य ती ट्रेनिंग देण्याची गरज असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.