गजानन मारणे याच्या आणखी चार साथीदारांना अटक

0

पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मुंबई-पुणेएक्स्प्रेस वेवर जंगी मिरवणूक काढल्याप्रकरणी गजानन मारणे याच्या चार साथीदारांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याच्या समर्थकाच्या आठ गाड्या जप्त केल्या असून मालकांचा शोध सुरू आहे.

कोथरूड पोलिसांनी गजानन मारणे आणि आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखलल करून मारणेसह नऊ साथीदारांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली होती. तर काही जण फरार होते. यातील चार जणांना आता कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. शेखर आडकर (३३), अमित कुलकर्णी (३८), संजय पिसाळ आणि अमोल तापकीर अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

यापूर्वी पोलिसांनी गजानन मारणे, प्रदीप कंदारे, बापू बागल, अनंता कदम, गणेश हुंडारे, रुपेश मारणे, सुनील बनसोडे, श्रीकांत पवार, सचिन ताकवले यांना १६ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. काल, १८ फेब्रुवारी रोजी या गुन्ह्यातील आरोपी मारणे याच्या इतर साथीदारांचा शोध घेतला असता, या चार जणांना कोथरूड परिसरातून अटक करण्यात आली.

पुणे शहर आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बडे आणि इतर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.