पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव विजय कोळी यांनी एका स्थानिक बांधकामाला विरोध केला. तसेच पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार केली होती. याचाच राग मनात धरुन हा कट रचला होता. असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
अब्दुल अजीज शेख उर्फ अज्जू हा मुख्य सुत्रधार आहे. ताडदेवमधील अनधिकृत झोपडपट्ट्यांना अधिकृत करण्यासाठी तो प्रयत्न करत होता. विजय कोळी यांनी या विरोधात पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार केली होती. याचा राग शेख याच्या मनात होता. तसेच आरोपी आणि विजय कोळी यांच्यामध्ये राजकीय वैमनस्यदेखील आहे. विजय कोळी यांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यासाठी अब्दुलने इतर आरोपींना पैसे देऊन कोळी यांच्या गाडीत ड्रग्ज ठेवले.
या गुन्ह्यातील आरोपी अय्याज याला मंगळवार (दि.9) रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून 150 ग्रॅम मेफेड्रॉन (MD) जप्त केले होते. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत हा प्रकार उघडकीस आला आहे. चौकशीमध्ये अय्याजने पोलिसांना सांगितले की, विजय कोळी यांच्या कारमध्ये ड्रग्ज ठेवण्यासाठी आणि नंतर पोलिसांना फोन करुन टीप देण्याची सुपारी दिल्याची कबुली त्याने दिली, अशी माहिती दत्ता नलवडे यांनी दिली.