मनसे पुणे शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे, मनसे कामगार सेना सरचिटणीस सचिन गोळे, मनसे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष साबळे, मनसे कामगार सेना सहचिटणीस मनोज खराबी,पिंपरी- चिंचवडचे नगरसेवक सचिन चिखले, रुपेश म्हाळसकर, अंकुश तापकीर, तुषार बवले, गणेश नारायण गायकवाड, ओंकार अरुण इंगवले, तसेच जेबीएम कंपनीमधून कामावरून कमी केलेले, दुसऱ्या प्लांटमध्ये बदली केलेले कामगार आणि मनसे पक्षाचे कार्यकर्ते अशा एकूण ३०० ते ३५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथे जेबीएम कंपनी आहे. कंपनी प्रशासनाने मागील काही दिवसांपूर्वी कंपनीतील काही कामगारांना कामावरून कमी केले. तसेच काही कामगारांची कंपनीच्या दुस-या प्लांटमध्ये बदली केली. यावरून मनसे पक्षाच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी दुपारी कंपनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
जेबीएम ऑटो लिमिटेड कंपनीने कमी केलेल्या तसेच दुसऱ्या प्लांटमध्ये बदली केलेल्या कामगारांना महाळुंगे येथील प्लांटमध्येच कामावर घ्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असताना तसेच मोर्चासाठी परवानगी नसताना आरोपींनी मोर्चा काढला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत भारतीय दंड विधान कलम 143, 188, साथीचा रोग प्रतिबंधक कायदा सन 1897 चे कलम 3, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम कलम 51 (ब), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.