पुणे, : ‘सिरम’ बनवत असलेल्या लशीच्या नावावर नांदेड येथील ‘क्युटीस बायोटीक’ या कंपनीने हरकत घेत येथील न्यायालयात दाखल केलेल्या व्यावसायिक दाव्यात तात्पुरत्या मनार्इ अर्जावरील युक्तिवाद शुक्रवारी पूर्ण झाला. त्यावर ३० जानेवारी रोजी निकाल होणार आहे. सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
‘कोव्हिशिल्ड’ या नावाचा वापर ‘सिरम’ने थांबवावा, अशी मागणी ‘क्युटीस बायोटीक’ ने केली आहे. त्यावर शुक्रवारी दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली. ‘क्युटीस बायोटीक’ ने ट्रेडमार्कचा अर्ज कंपनी असलेल्या ठिकाणी करायला हवा होता. मात्र त्यांनी तो दिल्लीतील रजिस्टरकडे केला आहे. मानवी लस बनविण्यासाठी अनेक परवानग्या आणि प्रयोग तसेच बांधकाम आवश्यक असते. सिरमने त्याची सर्व तयारी केली आहे. मात्र तशी तयारी ‘क्युटीस बायोटीक’ने केलेली नाही. वस्तूंच्या खरेदीबाबत न्यायालयात सादर केलेली बिले ही हर्बल उत्पादनांची आहेत. तसेच लशीबाबत ‘सिरम’ने पहिल्यांदा अर्ज केला असून लशीचे वितरण देखील सुरू झाले आहे, असा युक्तिवाद सिरमच्या वतीने ॲड. एस. के. जैन यांनी केला.
‘पासिंग आॅपचा दावा करताना त्यात ट्रेडमार्क नोंदणीचा अर्ज महत्वाचा नसतो. आम्ही ट्रेडमार्कच्या नोंदणीसाठी अर्ज केल्याचे ‘सिरम’ला जुलैमध्येच माहिती होते. मात्र नांदेडमध्ये दावा दाखल झाल्यानंतर नोंदणी अर्जाची बाब समल्याचे सिमरच्या सेमध्ये नमूद आहे. उत्पादने वेगळे असली तरी ‘कोव्हिशिल्ड’ या ट्रेडमार्कचे आम्ही पहिले वापरकर्ते आहेत, असा युक्तिवाद ‘क्युटीस बायोटीक’च्या वतीन ॲड. आदित्य सोनी यांनी केला. आपली बाजू मांडताना ॲड. सोनी यांनी विविध न्यायनिवाडे न्यायालयात सादर केले. दरम्यान ‘क्युटीस बायोटीक’ने नांदेडमधील न्यायालयात ट्रेडमार्कबाबत दाखल केलेला दावा मागे घेण्यासाठी अर्ज केला आहे.