पुणे : रेल्वेमध्ये प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला मारणाऱ्यास न्यायालयाने चार महिने 29 दिवसांची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.एम.राऊत यांनी हा निकाल दिला.
सचिन मारुती शिंदे (रा.दौंड) अशी शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर 2019 मध्ये पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल होते. पोलिसांनी तांत्रिक व खबऱ्यांमार्फत तपास करून शिंदे याला जेरबंद केले. त्यानंतर पोलिसांनी योग्य ते साक्षीपुरावे न्यायालयासमोर मांडले. न्यायालयाने साक्षी पुरावे पडताळल्यानंतर शिंदेला शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले.याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनिल कदम, अनिल दांगट यांनी केला. त्यांना पोलीस अंमलदार बमनालीकर व कृष्णा गुरव यांनी सहकार्य केले.
रेल्वेमध्ये प्रवाशांच्या किंमती ऐवजावर डल्ला मारण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असतात. सराईत गुन्हेगारांना गुन्ह्या मोठी शिक्षा झाली तर चोऱ्या माऱ्यांच्या प्रकाराला आळा बसतो. यामुळे गुन्हयात अटक केलेल्या गुन्हेगारास जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यादुष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक (लोहमार्ग) सदानंद वायसे व अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी दिले आहेत.