स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटिनने भरलेली स्फोटकं असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. याबाबत पोलिसांनी अधिकृत अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं असल्याचं समोर येत आहे. पोलिसांचा सध्या तपास सुरु आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल आहे.
अंबानींच्या बंगल्याजवळ संबंधित स्कॉर्पिओ गाडी बराच वेळ थांबली होती. पोलिसांनी पार्किंगच्या अनुषंगाने जरी कारवाई केली त्यावेळी हा सगळा प्रकार उघड झाला. आता सगळ्या तपास यंत्रणा परिसरात पोहोचल्या आहेत. संबंधित परिसर हा व्हीआयपी आहे.
विशेष म्हणजे मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. नरिमन पाईंटमधला हा रोड आहे. तो व्हीआयपी रोड म्हणून ओळखला जातो. त्या रस्त्यावर नेहमीच मोठा पोलीस बंदोबस्त असतो. या परिसरात ही गाडी सापडल्यानं पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेकडे याचा तपास देण्यात आलाय.
मुकेश अंबानी यांना याआधी धमकीचे पत्र आले होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यांच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात त्यांना धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.