नवी दिल्ली : देशातील पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, केंद्रशासित पुदुच्चेरी आणि आसाम राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे.
पश्चिम बंगालमधल्या 294 जागांसाठी, तमिळनाडूतल्या 234 जागांसाठी, केरळातल्या 140, आसाममधल्या 126 तर केंद्रशासित पुदुच्चेरीतल्या 30 जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण 824 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. 18.68 कोटी मतदार यासाठी आहेत.
आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. 27 मार्चपासून मतदानाला सुरुवात होईल. मतमोजणी 2 मेला होईल.
केरळ आणि तमिळनाडूत आणि पुदुच्चेरीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 6 एप्रिलला मतदान होईल आणि 2 मे रोजी मतमोजणी आणि निकाल लागेल.
आसामची निवडणूक 3 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान 27 मार्चला होईल. दुसऱ्या टप्याचे मतदान 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिलला होईल.
पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक टप्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 01 एप्रिल, तिसरा टप्पा 06 एप्रिल आणि चौथा टप्पा 10 एप्रिलला होईल. पाचवा टप्पा मतदान 17 एप्रिल, सहावा 22 एप्रिल, सातवा 26 एप्रिल, आठवा टप्पा 29 एप्रिलला होईल. त्यानंतर 2 मेला निकाल लागण्याची शक्यता आहे.