पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेची सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याऐवजी भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याच हस्ते काल ऑनलाईन काढण्यात आली. मात्र या ऑनलाईन सोडतीचा पूरता फज्जा उडाला. जावडेकरांचे भाषण पाहणे सोडा, ऐकायलाही मिळाले नाही. तर, उपस्थित असलेले भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे भाषण ऐकूच आले नाही. त्यावर त्यांचा आवाज कोणी म्यूट केला, अशी उपरोधीक प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या एका नेत्याने दिली. तर, महापौरांनी भाषण वाचून दाखवले.
वाढत्या कोरोनामुळे ही सोडत ऑनलाईन काढण्याचा निर्णय पालिकेने घेऊन त्यासाठी गर्दी न करता ऑनलाईन उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, तांत्रिकदृष्ट्याच नाही, तर नियोजन आणि समन्वयाच्या पातळीवरही ही सोडत फेल गेली. त्यामुळे ती ट्रोल झाली.तिखट प्रतिक्रिया व उपरोधिक मिम्सचा त्यावर पाऊस पडला. जमत नसेल, तर करता कशाला, आमचा दररोजचा दीड जीबी डाटा संपला, पण ना काही पहायला मिळाले ना ऐकायला, कॅमेरा सुद्धा सरळ धरता येत नाही, का अशा कमेंटस सोडतीवर आल्या.
यानंतर आता या सगळ्या गोष्टींवर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आपली प्रतिक्रिया देत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. यावेळी वाघेरे हे पिंपरी चिंचवड सामाजिक न्याय विभाग पद वाटप व आढावा बैठकीच्या कार्यक्रमात बोलत होते, वाघेरे म्हणाले कि, उपमुखमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १५ वर्षात जे काम झालं. त्या विकासपुढे या पाच वर्षात भाजपने काय केलय, हे दाखवून द्यावं.
काल महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेची सोडत झाली. तो कार्यक्रम मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला. आजून कामाचा पत्ता नाही आणि इकडं भाजपवाल्यांनी फक्त इव्हेंट भरवायचंच काम केलय. रावेतच्या जागेवर अजून स्टे आहे. तर मोशी आणि तळवडे या ठिकाणी ५ ते १० टक्केच काम झालय. परंतु इकडं हे कार्यक्रम करून मोकळे झालेत. व सामान्य नागरिकांनाच संभ्रमात पडण्याचा विषय भाजपकडून केला जातोय. असंही ते यावेळी म्हणाले.