पुणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. अभ्यासिका 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील. तसेच रात्रीचे संचार निर्बंधही कायम असणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत रविवारी (ता. २८) निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शाळा-महाविद्यालये आणखी १५ दिवस बंद ठेवण्याबाबत प्रशासनाचे एकमत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने नुकताच घेतला होता. त्याची मुदत २८ फेब्रुवारीला संपत आहे. सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. तथापि शाळा-महाविद्यालये प्रत्यक्षात सुरू करण्याबाबत नेमका काय निर्णय होणार, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून होते..
कोरोनाच्या नवीन लाटेत संसर्ग वाढू नये, यासाठी उपाययोजना करण्यासाठी “आयसर’ आणि “टीसीएस’ या दोन संस्थांकडून अभ्यास सुरू आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा केली. शाळा-महाविद्यालये आणखी १५ दिवस बंद ठेवावीत, अशी चर्चा यावेळी झाली.