चोरीच्या उद्देशाने खून करणाऱ्या दोघाना अटक

0

पिंपरी : जबरी चोरीच्या उद्देशाने आळंदी घाटावर फिरत असलेल्या गुन्हेगाराचा खून करणाऱ्या दोघांना आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. कोणताही पुरावा नसताना जॅकेट मध्ये सापडलेल्या एका नंबर वरुन आळंदी पोलिसांनी हा तपास केला.

संतोष उर्फ कांच्या केरबा कांबळे (19, रा. काळेवाडी देहूफाटा, ता. आळंदी), केतन प्रकाश शिंदे (18 वर्ष 3 महिने, रा. नगर परिषद जवळील झोपडपट्टी, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार देविदास उर्फ देव्या बबन चौरे (रा. हडपसर) फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

महादेव शाम खंदारे (वय 30) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारी रोजी धीरज संजय कुबेर (वय 30, रा. आळंदी) यांनी आळंदी पोलिसांना माहिती दिली की, इंद्रायणी नदीच्या घाटावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. त्याच्या डोक्यात जड वस्तूने मारले असून चेहरा विद्रुप केला आहे. त्यानुसार आळंदी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला.

सुरुवातीला घटनेबाबत काहीही पुरावा आढळला नाही. मयताच्या मोबाईल फोनवरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मयताची ओळख पटली असली तरीही आरोपींबाबत काहीएक माहिती मिळत नसल्याने पोलिसांची सुरुवातीला तारांबळ उडाली.

आळंदी पोलिसांनी दोन पथके तयार करून गुन्ह्याचा तपास सुरु केला. पोलिसांनी इंद्रायणी घाटावरील आपल्या खब-यांना कामाला लावून इंद्रायणी घाटावर नेहमी फिरत असलेल्या संशयितांची नावे मिळवली. त्यात संशयित आरोपी निष्पन्न करून संतोष आणि केतन या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी त्यांच्या देविदास नावाच्या साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. आळंदी घाटावर फिरत असताना मयत महादेव खंदारे यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने चोरताना त्यांच्यात झालेल्या वादातून हा प्रकार केल्याची आरोपींनी कबुली दिली.

मयत व्यक्ती महादेव खंदारे याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सन 2016 साली खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्याला अटक झाली होती तसेच तो सध्या कारागृहात होता. कोरोना काळात त्याला तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले होते.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, उपनिरीक्षक सुरेखा सागर, बापू जोंधळे, पोलीस अंमलदार राजाराम लोणकर, बाळासाहेब खेडकर, नितीन साळुंखे, बाजीराव सानप, गजानन आडे, कैलास गर्जे, त्रिमूर्ती भोंडवे, दत्तात्रय टोके, संदीप रसाळ, रामदास मुकणे, मछिंद्र शेंडे यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.