मुंबई : केंद्र सरकारकडून जीएसटीची २९ हजार २९० कोटी रुपयांची रक्कम महाराष्ट्राला अद्याप येणे बाकी असल्याचे सांगतानाच राज्याचे महसुली उत्पन्न कोरोनामुळे ३५ टक्क्यांनी घटले असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधिमंडळ अधिवेशनात सोमवारी सांगितले.
राज्यपाल म्हणाले की, फेब्रुवारी २०२१ अखेर वस्तू व सेवा कराची नुकसानभरपाई म्हणून राज्य शासनास देय असलेल्या ४६ हजार ९५० कोटी रुपयांपैकी केवळ ६ हजार १४० कोटी रुपये आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नुकसानभरपाईसाठी कर्ज म्हणून ११ हजार ५२० कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत.
राज्यात ३ लाख ४७ हजार कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न अपेक्षित असताना जानेवारीअखेर केवळ १ लाख ८८ हजार ५४२ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. अंदाजापेक्षा तो ३५ टक्क्यांनी कमी आहे, असे राज्यपाल म्हणाले. असे असूनही राज्य शासनाने कोरोना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या, अशी प्रशंसा त्यांनी केली.
कोरोनामुळे औद्योगिक मंदी असूनही महाराष्ट्राने एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची देशांतर्गत व विदेशी थेट गुंतवणूक आकर्षित केली आहे. गावे, रस्ते, वाड्यांना महापुरुषांची नावे देण्याचा चांगला निर्णय सरकारने घेतला.