पुणे : रक्कम स्विकारूनही भूखंडाचा ताबा न देणाऱ्या टेंपल रोझ प्रा.लि. ला ग्राहक निवारण आयोगाने दणका दिला आहे. तक्रारदारांनी भरलेले नऊ लाख ७३ हजार 582 रुपये 1 जुलै 2015 पासून वार्षिक 10 टक्के व्याजाने परत देण्याचा आदेश अध्यक्ष अनिल जवळेकर, सदस्य शुभांगी दुनाखे आणि जे. व्ही. देशमुख यांनी दिला आहे.
याबरोबरच नुकसान भरपाईपोटी 25 हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 5 हजार रुपये देण्यात यावेत, असेही आयोगाने आदेशात म्हटले आहे. विष्णू यादव जवरे (रा. जवरे वस्ती,पो. बांबोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांनी ऍड. पवनकुमार भन्साळी यांच्यामार्फत अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती. टेंपल रोझ प्रा.लि. द्वारा डायरेक्टर्स देविदास गोविंदराम सजनानी आणि दीपा देविदास सजननी (रा. मुंबई) यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली होती.
वर्तमानपत्रातील जाहिरात पाहून तक्रारदार यांनी जाबणेदारच्या पुणे येथील कार्यालयास भेट दिली. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील प्रकल्पातील भूखंड क्रमांक 810 आणि 811 ची अनुक्रमे 4 लाख 3 हजार 040 आणि 3 लाख 77 हजार 850 रुपयांना म्हणजे दोन्ही मिळून 9 लाख 74 हजार 982 रुपायांना खरेदी करण्याबाबत करार केला. करारनामा केल्यापासून पाच वर्षांच्या आत भूखंड विकसित करून ताबा देण्याचे ठरले होते. मात्र, ताबा देण्यातच आला नाही. डायरेक्टर तुरूंगात गेले असल्याचे समजले. त्यानंतर रक्कम परत मिळण्याबाबत तक्रारदारांनी मागणी केली. मात्र, ती रक्कम परत न मिळाल्याने तक्रारदारांनी ग्राहक मंचात धाव घेतली.
ऍड. पवनकुमार भन्साळी यांच्यामार्फत दाखल केलेल्या दाव्यात भरलेली रक्कम, त्यावर व्याज, व्याजाच्या रक्कमेवर व्याज, नुकसान भरपाई आणि तक्रार अर्जाचा खर्च मागण्यात आला. नोटीस बजावूनही जाबदेणार आणि त्यांच्या वतीने कोणीही निवारण आयोगात हजर राहिले नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाने वरील निकाल दिला.