देशातील सर्व खासगी रुग्णालयांत मिळणार कोरोना लस

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत आहे. यामुळे लोकांना लवकरात लवकर कोरोनाची लस मिळावी यासाठी सर्व खासगी रुग्णालयांमार्फत लसीकरण सुरू करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. सध्याचा वेग अतिशय कमी असल्याने या सूचना केंद्राने दिल्या आहेत.

मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत देशातील १ कोटी ४८ लाख लोकांनाच कोरोनाची लस देण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षे वयावरील व्याधीग्रस्त यांना सोमवारीच लस देणे सुरू झाले आहे. त्यांची  संख्याही तब्बल २७ कोटी असून, त्यांच्यातील २ लाख ८ हजार जणांचेच लसीकरण  आतापर्यंत झाले आहे.

या वेगाने देशातील १३५ कोटी जनतेला लस देण्यास कित्येक वर्षे लागू शकतील. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी  केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.  खासगी रुग्णालयांमुळे लोकांना लवकर लस मिळू शकेल. या मोहिमेत खासगी रुग्णालये, दवाखाने, संस्था यांची मदत घ्यावी, असे आवाहन यापूर्वी अनेकांनी केलेच आहे.

सध्या देशात १० हजार खासगी रुग्णालयांतच लस दिली जाते. पंतप्रधान जनआरोग्य योजनेतील रुग्णालयांचाच सध्या लसीकरणासाठी समावेश आहे. याखेरीज काही हजार रुग्णालये ही लस देण्यासाठी तयार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.