पुणे : रोझरी स्कुलमध्ये ऍडमिनिस्टेटर म्हणून नोकरीस असलेल्या व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रांच्याद्वारे एक कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणात दोघांचा जामीन सत्र न्यायाधीश एस. आर. भांगडीया यांनी फेटाळला.
संदीप सुरेश कांबळे (वय ५२, रा. पिंपरी) आणि अश्विन अशोक कामत (वय ४९, रा. वानवडी) अशी त्या दोघांची नावे आहेत. याबाबत प्रसाद नलावडे (वय ५१, रा. शंकरशेठ रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. सन २०१४ ते २०२० या कालावधीत ही घटना घडली. स्कुलचे अध्यक्ष विनय अऱ्हाना यांनी आणि इतरांनी पदाचा गैरवापर करून स्वत:च्या फायद्यासाठी महागड्या गाड्या खरेदीसाठी फिर्यादींच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे दि सेवा विकास को-ऑपरेटीव्ह बॅंक येथे अर्ज सादर केली.
फिर्यादीचे वाढीव उत्पन्न दाखवून एक कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज मंजुर करण्यात आले. त्याद्वारे फिर्यादींच्या नावेच महागड्या गाड्या घेण्यात आल्या. यातील कर्जाची परतफेड म्हणून फिर्यादींच्या बनावट खात्यावर रक्कमही भरण्यात आली आहे. फिर्यादींनी न घेतल्या कर्जाबद्दल फिर्यादींच्या विरोधात उपनिबंधक कार्यालयात खोटा दावा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार फिर्यादींनी अऱ्हाना आणि बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात कांबळे आणि कामत या दोघांना जामिनासाठी अर्ज केला. यास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोबटकर यांनी विरोध केला. गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामध्ये जनतेचा पैसा अडकला आहे. अश्विन याने इतर आरोपींच्या सहाय्याने बनविलेले बनावट लिव्ह अँड लायसन्स लस्त क्रमांक 8755/2014 मध्ये साक्षीदारांची नावे स्वत:च्या हस्तक्षरात लिहल्याचे कबुल केले आहे. बनावट भाडेकरार नाम्यावर कोणी सही केली, याचा तपास सुरू आहे. जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांना साक्ष देण्यापासून परावृत्त करू शकतो. त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी ऍड. बोंबटकर यांनी केली.