जळगाव वसतिगृहातील ‘त्या’ प्रकरणाचे सत्य आले बाहेर

गृहमंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती

0

मुंबई : राज्यभरात गाजत असलेल्या जळगाव वसतीगृह प्रकरणातील सत्य बाहेर आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत जळगाव वसतीगृहात पोलिसांकडून महिलांना नग्न करुन नाचवण्यात आल्याचा प्रकार घडलाच नसल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात होत असलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

अनिल देशमुख यांनी गुरुवारी जळगाव वसतीगृह प्रकरणाच्या चौकशी अहवालातील माहिती विधानसभेत मांडली. यावेळी त्यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्यामध्ये चार महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता.

या वसतीगृहात 17 महिला राहत होत्या. 20 फेब्रुवारी रोजी या वसतीगृहात एक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गरब्याचा डान्स सुरु होता. तेव्हा त्रास होत असल्यामुळे एका महिलेने अंगातील झगा उतरवून ठेवला. याउपर त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांकडून महिलांना नग्न नाचवण्यात आल्याची रत्नमाला सोनार यांनी केलेली तक्रार खोटी असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

जळगाव वसतीगृहात असा कोणताही प्रकार न घडल्याचे समोर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. याप्रकरणात ज्यांनी बदनामी केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या आरोपांमुळे राज्याची आणि वसतीगृहातील महिलांची बदनामी झाल्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले.

तर अजित पवार यांनीही विरोधी पक्षाच्या नेत्यांना चिमटा काढला. महिलांच्याबाबत आपण कोणीही अन्याय खपवून घेणार नाही. मात्र, एखादा आरोप करताना विरोधी पक्षाने पूर्ण शहानिशा करावी, वस्तुस्थिती लक्षात घ्यावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.