मुंबई : राम मंदिराच्या उभारणीसाठी तुम्हाला कोणी पैसे गोळा करायला सांगितले? पैसे गोळा करण्याचा ठेका तुम्हाला रामाने दिला आहे का ?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करताच भाजप सदस्यांनी त्यास जोरदार आक्षेप घेतला. मात्र पटोले यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपले म्हणणे रेटले.
पटोले म्हणाले, माझ्याकडे मनोहर कुलकर्णी नावाचे गृहस्थ आले होते. श्रीरामाच्या मंदिरासाठी निधी देण्यास नकार दिल्याने त्यांना धमक्या देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मंदिरासाठी विना परवानगी असा निधी गोळा करण्याचा ठेका या लोकांना कोणी दिला? धर्मादाय आयुक्तांची रीतसर परवानगी घेतली होती का? असे सवालही पटोले यांनी केले.? त्यावरुन भाजप सदस्य आक्रमक झाले.
सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला. आज हा विषय नसताना त्यावर चर्चा करणे योग्य नाही. हिंमत असेल तर राममंदिरावर स्वतंत्र चर्चा लावा, असो आव्हान त्यांनी सत्तापक्षाला दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब केले.