पुणे शहराच्या मध्यभागातील २२ बूस्टर्स हस्तगत

0

पुणे : डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (डीओटी) च्या वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएमओ) स्थानिक प्रशासन आणि मोबाईल ऑपरेटर्सच्या संयुक्त पथकासह शहरातील मध्यभागात छापे टाकले. या छाप्यामध्ये घरे, दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये बसविण्यात आलेले बेकायदेशीर मोबाईल सिग्नल रिपीटर्स काढून टाकण्यात आले.

या छाप्यामध्ये २२ बूस्टर्स हस्तगत करण्यात आले. तर फीडर जॉइंट्स कापून १५ बूस्टर्स निकामी करण्यात आले. याबाबत फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दतील सात आस्थापनांना नोटीस जारी करण्यात आली आहे. आयईएस अधिकारी अमित गौतम यांच्या सूचनेनुसार व डब्ल्यूएमओ, डीओटी गजेंद्र मेवारा, कैलासनाथ आणि आर. एन. लहाडके यांच्या पथकाने ही कारवार्इ केली.

बेकायदेशीर बूस्टर्सच्या विरोधात आम्ही सातत्याने कारवाई करत आहोत. २०२० मध्ये सुमारे ५०० बूस्टर्स आम्ही काढून टाकले आहेत. त्याचबरोबर आम्ही कॉल ड्रॉप्ससाठी कारणीभूत ठरणा-या आणि मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी कमी करणा-या बेकायदेशीर बूस्टर्सच्या विरोधात जनजागृती मोहिमाही राबवल्या आहेत. या वर्षात आतापर्यंत ३१९ रिपीटर्स, २७९ निष्क्रीय रिपीटर्स काढून घेतले व १०७ नोटिसा देण्यात आल्या आहेत. लोकांनी बेकायदेशीर रिपीटर्स वापरू नयेत कारण त्यांच्यामुळे मोबाईल नेटवर्क्समध्ये खूप मोठा अडथळा येऊ शकतो, अशी माहिती गौतम यांनी दिली.

आपले ग्राहक किंवा कर्मचा-यांना अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी स्पेक्ट्रम मिळविणारे आणि नेटवर्कचे वितरण करणे ऑपरेटर कंपन्या प्रचंड गुंतवणूक करत असतात. पण बेकायदेशीर बूस्टर्समूळ मोबाईल नेटवर्कमध्ये व्यत्यय येतो. असे बुस्टर शोधण्यासाठी व त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी अधिका-यांना पाचारण करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

डीओटीच्या वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) नुसार भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायदा, १९३३ आणि भारतीय टेलिग्राफ कायदा, १८८५ नुसार बेकायदेशीर रिपीटर्स बाळगणे किंवा विकणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे. अशाप्रकारचे बेकायदेशीर रिपीटर्स बसविणा-या अनेक इमारतींच्या मालकांना मोठा दंड आकारला जाऊ शकतो.
अमित गौतम, आयईएस अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.