पूजा चव्हाण आत्महत्या; तपास करून गुन्हा दाखल करण्याचे खटले न्यायालयाने फेटाळले

0
पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी लष्कर न्यायालयात दाखल करण्यात आलेले दोन्ही खासगी दावे न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग हे गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे नाहीत, असे नमूद करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांनी हे खटले फेटाळले.

या प्रकरणाची वानवडी पोलिसांनी चौकशी करावी. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या खटल्यांत करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीच्या अध्यक्षा ॲड. र्इशाना जोशी आणि लीगल जस्टिस सोसायटीतर्फे ॲड. भक्ती पांढरे यांनी खटला दाखल करण्यासाठी अर्ज केले होते. त्यानुसार या प्रकरणात दोन खासगी दावे देखील झाले होते. या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलिसही स्पष्ट करीत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हावा. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना करावेत, यासाठी हे दावे दाखल करण्यात आले होते.

पूजा यांच्या आत्महत्येनंतर माजीमंत्री संजय राठोड यांच्यासोबतचे त्यांचे फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. त्यावरून त्यांच्यातील संबंधाबाबत चर्चेला उधाण आले आहे. राजयकीय दबावातून पोलिस गुन्हा दाखल करीत नाही, असा मुद्दा या निमित्ताने उपस्थित झाला होता. मात्र पुजा यांच्या कुटुंबातील कोणी तक्रार करण्यासाठी पुढे आले तर फिर्याद दाखल करू अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती.

समाज माध्यमावर उपलब्ध असलेले फोटो आणि व्हायरल झालेले कॉल रेकॉर्डिंग यावरून गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे नाहीत. पोलिसांनी या प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याचा तपास अद्याप सुरू आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

सत्र न्यायलयात दादा मागणार :
गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही पोलिसांत तक्रारअर्ज केला होता. त्याची पोहच पावती न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालाच्या विरोधात आम्ही सत्र न्यायलयात दाद मागणार आहोत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीच्या अध्यक्षा ॲड. र्इशाना जोशी यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.