दिग्दर्शक अनुराग व अभिनेत्री तापसी यांच्या चौकशीवर शिवसेनेची मोदी सरकारवर तोफ

0
मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेत्री तापसी पन्नू यांची सध्या आयकर विभागाकडून कसून चौकशी सुरु आहे. ही छापेमारी राजकीय हेतूने केल्याचा आरोप करत विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. यावर शिवसेनेनंही मोदी सरकारवर तोफ डागली आहे.
‘सामना’च्या अग्रलेखातून अनुराग कश्यप व तापसी पन्नू यांच्याविरोधात सुरू असलेल्या आयकरच्या कारवाई भाष्य केलं आहे.

मोदी सरकारचं समर्थन करणाऱ्या कलाकारांनाही शिवसेनेनं टोला लगावला आहे. “देशातील राजकीय चित्र अधिकाधिक स्पष्ट होत आहे की, अधिकाधिक गोंधळाचे आणि गुंतागुंतीचे होत आहे? केंद्र सरकारविरुद्ध टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले असतानाच मोदी सरकारविरुद्ध परखड बोलणाऱ्या कलाकार, सिनेसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शकांवर ‘इन्कम टॅक्स’ने धाडी घालायला सुरुवात केली आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल, सिने वितरक मधू मँटेना हे त्यात प्रमुख आहेत.

मुंबई-पुण्यात ३० पेक्षा जास्त ठिकाणी धाडी घातल्या. तापसी पन्नू, अनुराग कश्यप हे त्यांची मते परखडपणे मांडत असतात. एक प्रश्न यामुळे असा निर्माण होतो की, हिंदी सिनेसृष्टीतले इतर सर्व व्यवहार, उलाढाली स्वच्छ आणि पारदर्शक आहेत, अपवाद फक्त तापसी आणि अनुराग कश्यप यांचा. सिनेसृष्टीतल्या अनेक महान उत्सवमूर्तींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात विचित्र भूमिका घेतली. त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा तर दिला नाहीच, उलट जगभरातून जे लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत होते त्यांचा पाठिंबा म्हणजे आपल्या देशात ढवळाढवळ असल्याचे मत या उत्सवमूर्तींनी व्यक्त केले. पण तापसी, अनुराग कश्यपसारखी मोजकी मंडळी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभी राहिली. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे,” असं म्हणत शिवसेनेनं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत असल्याचं म्हटलं आहे

“२०११ मध्ये केलेल्या एका व्यवहारासंदर्भात हे छापे आहेत. या मंडळींनी एक ‘प्रॉडक्शन हाऊस’ स्थापन केले व त्याबाबत करचुकवेगिरीचा हा मामला आहे. ज्याअर्थी इन्कम टॅक्सने धाडी घातल्या त्याअर्थी कुठे तरी गडबड आहेच, पण धाडी घालण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी फक्त याच लोकांची का निवड केली? तुमच्या त्या ‘बॉलीवूड’मध्ये जी कोटीच्या कोटी उड्डाणे रोज होत असतात ते काय गंगाजलाच्या प्रवाहातून वर येतात? पण व्यवहारात कोठे तरी पाणी मुरतच असल्याने सरकारच्या तालावर नाचायचे व बोलायचे हेच आतापर्यंत घडत आले. त्यातले काही लोक मात्र स्वाभिमानी किंवा वेगळ्या धाटणीचे असतात. मुळात ‘बॉलीवूड’ लॉक डाऊन काळात प्रचंड अडचणीत आहे.

चित्रीकरण, नव्या निर्मिती बंद आहेत. सिनेमागृहे बंद आहेत. एक मोठा उद्योग व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असताना त्यावर राजकीय सूडबुद्धीने असे हल्ले करणे योग्य नाही. मोदी सरकारची उघड चमचेगिरी करणारे कित्येकजण सिनेसृष्टीत आहेत. त्यातले अनेकजण तर मोदी सरकारचे सरळ लाभार्थीच आहेत. त्या सगळ्यांचे व्यवहार आणि उलाढाली धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहेत काय? भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केल्यामुळे कारवाई होत असल्याचे आरोप माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फेटाळले आहेत. तपास यंत्रणांकडे जी खात्रीशीर माहिती येते त्याआधारे कारवाई केली जाते, अशी ‘दिव्य’ माहिती जावडेकरांनी दिली आहे. म्हणजे बॉलीवूडमधील भलेबुरे धंदे जणू समस्त देशवासीयांना माहीतच नव्हते असे केंद्रीय मंत्र्यांना म्हणायचे आहे काय?,” असं सांगत शिवसेनेनं प्रकाश जावडेकर यांच्यावरही निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.