मुंबई : कोरोना लस घेतल्यानंतर काळजी घेणे गरजेचे आहे. लसींचे डोस घेतल्यानंतर शरिरात विषाणूशी लढण्यासाठी अण्टीबॉडीज तयार होण्यासाठी महिन्याभराच्या कालावधीत स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत आरोग्य क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी मांडले.
साधारणतः ७० ते ८० टक्के लोकांमध्ये लस घेतल्यानंतर चांगला परिणाम दिसून आला आहे. परंतु, कोरोना लस घेतल्यानंतर नागरिकांनी निष्काळजीपणे वागू नये. लस दोन टप्प्यात दिली जात आहे. एकदा लस घेतल्यानंतर महिन्याभराने दुसरी दिली जाते. दोन्ही लसींचे डोस घेतल्यानंतर शरिरात विषाणूशी लढण्यासाठी अण्टीबॉडीज तयार होतात. परंतु, लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होईल का, हे सांगणे अवघड आहे. परंतु, कोविड-१९ लस ही अतिशय सुरक्षित असून, लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्याकरिता लसीकरणामुळे फायदा होईल. लग्न समारंभ, पार्टी,, वाहतूक यंत्रणा सुरू केल्याने रस्त्यावर गर्दी वाढत आहे. गर्दीतही लोक मास्क न लावताच फिरताना दिसतात. लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. सर्वप्रथम हे थांबवणे आवश्यक आहे. किंबहुना कोरोना राेखण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. लसीकरणानंतरही आजाराचा संसर्ग होऊ नये, म्हणून काळजी घ्यायलाच हवी.