गुंतवणुकदारांची सव्वा दोन कोटींची फसवणूक; इन्व्हेस्टमेंट कंपनी चालकाचा अटकपुर्व जामीन फेटाळला

0
पुणे : गुंतवणूक केलेल्या पैशांवर व्याज व शेअर मार्केटमधून झालेला फायदा थेट आनलार्इन खात्यात जमा करण्याचे आमिष दाखवत दोन कोटी १८ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इन्व्हेस्टमेंट कंपनी चालकाचा अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांनी हा आदेश दिला. या प्रकरणात २५ हून अधिक नागरिकांची फसवणूक झाली आहे.

धनंजय जगन्नाथ जंगम (वय २६, रा. सदाशिव पेठ) असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सचिन शंकर सल्ले (वय ३७, रा. बोपोडी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुलै २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. जंगम याची व्हेस्टिरीका असोसीएसट ॲण्ड मंगलमय इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास त्यावर सात टक्के व्याज व गुंतवणूक केलेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवून त्यातून मिळणारा लाभ सरळ आनलार्इन पद्धतीने बँक खात्यात जमा होर्इल, असे आमिष त्याने फिर्यादी व इतर २५ व्यक्तींना दाखवले व फसवणूक केली, अशी फिर्याद देण्यात आली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर जंगम याने अटकपुर्व जामीनसाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. जामीन मंजूर झाल्यास आरोपी पसार होण्याची शक्यता आहे. त्याच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा तपास बाकी आहे. पैशाची कशी विल्हेवाट लावली याचा पोलिस शोध घेत आहेत. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी जंगम याला अटक करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा अटकपुर्व जामीनाचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. अगरवाल यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.